येथें बोलोनियां काय – संत तुकाराम अभंग – 1655
येथें बोलोनियां काय । व्हावा गुरू तरि जाय ॥१॥
मज न साहे वांकडें । ये विठ्ठलकथेपुढें ॥ध्रु.॥
ऐकोनि मरसी वृथा । जंव आहेसि तुं जीता ॥२॥
हुरमतीची चाड । तेणें न करावी बडबड ॥३॥
पुसेल कोणी त्यास । जा रे करीं उपदेश ॥४॥
आम्ही विठ्ठलाचे वीर । फोडूं कळिकाळाचें शीर ॥५॥
घेऊं पुढती जन्म । वाणूं कीर्ती मुखें नाम ॥६॥
तुका म्हणे मुक्ती । नाहीं आसचि ये चित्ती ॥७॥
अर्थ
त्यामहाराज हरिकथा करत असताना मध्येच येऊन त्यांना एका मनुष्याने विचारले महाराज मला ब्रम्हरस हवे आहे तेव्हा आपण मला उपदेश करावा आणि त्यावर महाराजला म्हणतात, अरे हरिकथा चालू असताना असे मध्ये बोलणे हे चांगले आहे काय आणि तुला जर गुरु करायचा असेल तर येथे बसू नको चालता हो. अरे येथे विठ्ठल कथा चालू आहे आणि या कथेच्या पुढे वेडेवाकडे बोललेले मला सहन होणार नाही. अरे तू जोपर्यंत आहेस तोपर्यंत हरिकथा ऐक आणि ते तू करत नसशील तर तुझा जिवंत असूनही काहीच उपयोग नाही. ज्यांना आपल्या आब्रुतीची आवड आहे त्यांनी हरिकथा चालू असताना माझ्यापुढे असे वेडेवाकडे बडबड करू नये. जर मला कोणी ब्रम्हज्ञान विषयी काही विचारीत असेल तर मी त्याला असे उत्तर देईल की हरिकथा आवडीने ऐकताना हरिकथाच तुला ब्रम्ह ज्ञानाचा उपदेश करील. आम्ही विठ्ठलाचे शूरवीर भक्त आहोत. कळिकाळ देखील आमच्या पुढे आला तरी आम्ही त्याचे शिर फोडू. आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ आणि हरीचे गीत व कीर्ती गात राहू. तुकाराम महाराज म्हणतात मुक्तीची इच्छा देखील आमच्या चित्तात येत नाही.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.