पाहातां रूप डोळां भरें । अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी ॥१॥
तो हा नंदनंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥ध्रु.॥
दिसतो हा नोहे तैसा । असे दिशाव्यापक । लाघव हा खेळासाठी । होतां भेटी परतेना ॥२॥
म्हणोनि उभी ठाकलीये । परतलीये या वाटा । आड करोनियां तुका । जो या लोकां दाखवितो ॥३॥
अर्थ
हरी चे रूप डोळ्याने पाहताच ते डोळ्यात भरते आणि अंतरंग हरी वाचून वेगळे राहत नाही. हरी आपल्या इच्छेनुसार जगामध्ये खेळ मांडत असतो आणि माया रूपाने अनेक रूपे धारण करत असतो. बाई हाच तो नंदाचा कृष्ण याची सेवा कशी करावी? तो जसा दिसतो तसा लहान नाही तर तो सर्व दिशा व्यापक आहे. देव मोठ्या चातुर्याने या संसारात खेळ खेळत असतो आणि याची भेट झाली तर मनुष्य पुन्हा संसाराकडे वळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरीची एकदा भेट झाली की मनुष्य पुन्हा भवसागराच्या वाटेला येत नाही, मी मुक्तीला प्राप्त न होता संसाराच्या वाटेला परतलो आहे, गवळण म्हणते मी तुकारामाला आड करून विरहिणी गवळणीच्या स्थितीतील अनुवाद करून तुम्हाला दाखवत आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.