जालों म्हणती त्याचें – संत तुकाराम अभंग – ११९०

जालों म्हणती त्याचें – संत तुकाराम अभंग – ११९०


जालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझें ॥१॥
शिजलिया अन्ना ग्वाही दांत हात । जिव्हेसी चाखत न कळे कैसें ॥ध्रु.॥
तापलिया तेला बावन चंदन । बुंदे एक क्षण शीतळ करी ॥२॥
पारखी तो जाणे अंतरींचा भेद । मूढजना छंद लावण्यांचा ॥३॥
तुका म्हणे कसीं निवडे आपण । शुद्ध मंद हीन जैसें तैसें ॥४॥

अर्थ

काही लोक म्हणतात आम्ही कृतकृत्य झालो मला त्यांच्ये आश्चर्य वाटते. कारण कोणत्याही प्रकारची परमार्थिक साधने न करता हे कसे कृतकृत्य झाले, आता मला त्यांच्याविषयी काही धीर धरवत नाही मी त्यांच्याविषयी जे काही बोलतो आहे ते तुम्ही ऐका .जर अन्न शिजवले तर त्याची ग्वाही हात आणि दात देतात तर मग जीभेने चव घेतली तर जिभेला अन्नाची चव कळणार नाही काय? उकळलेल्या तेलामध्ये बावन चंदन उगळून टाकले तर ते लगेच थंड होते. जे खरे पारखी असतात ते समोरच्याच्या अंतकरणातील सर्व विशेष भेद ओळखतात. परंतु जे अज्ञानी असतात ते सौंदर्‍यालाच भुलतात ते वरवरच पाहतात कारण त्यांना लावण्याचा छंद असतो. तुकाराम महाराज म्हणतात सोने कसाला लावले की त्यामध्ये उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे प्रकार केले जातात त्याप्रमाणे जे लोक आम्ही कृतकृत्य झालो असे म्हणतात त्यांची खरी परीक्षा अनुभवी संत घेतात परंतु अज्ञानी मनुष्य तसे न करता त्या कृतकृत्य म्हणणाऱ्या मनुष्याच्या वरवरच्या पोशाखाला भुलतात आणि त्याच्याकडेच पळतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जालों म्हणती त्याचें – संत तुकाराम अभंग – ११९०

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.