म्हातारपणीं थेटे पडसें – संत तुकाराम अभंग – 986

म्हातारपणीं थेटे पडसें – संत तुकाराम अभंग – 986


म्हातारपणीं थेटे पडसें खोकला । हात कपाळाला लावुनि बैसे ॥१॥
खोबरियाची वाटी जालें असे मुख । गळतसे नाक श्लेष्मपुरी ॥ध्रु.॥
बोलों जातां शब्द नये चि हा नीट । गडगडी कंठ कफ भारी ॥२॥
सेजारी म्हणती मरेना कां मेला । आणिला कांटाळा येणें आम्हां ॥३॥
तुका म्हणे आतां सांडुनी सर्वकाम । स्मरा राम राम क्षणक्षणा ॥४॥

अर्थ
म्हातारपणी माणसाला सर्दी, पडसे, खोकला असे विविध प्रकारचे रोग जडतात व याच विचाराने तो मनुष्य म्हातारपणी आपल्या कपाळाला हात लावून विचार करत बसतो. त्याचे तोंड खोबर्‍याच्या वाटीप्रमाणे झालेले असते आणि नाकातून नेहमीच शेंबडाचा पूरच गळत असतो. त्याच्या मुखाद्वारे व्यवस्थित शब्दही बाहेर पडत नाही कारण त्याच्या कंठामध्ये खूप कफ साठलेला असतो आणि तो सारखा गडगड वाजत असतो. आणि त्याचे असे रूप बघून शेजारचे म्हणतात हा मेला मरेना का म्हणुन याने आम्हाला कंटाळा आणला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता त्यामुळेच तुम्ही सर्व काम बाजूला सारा आणि मुखाने क्षणाक्षणाला राम राम असे स्मरण करा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

म्हातारपणीं थेटे पडसें – संत तुकाराम अभंग – 986

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.