न करीं तळमळ – संत तुकाराम अभंग – 809

न करीं तळमळ – संत तुकाराम अभंग – 809


न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥१॥
अविनाश सुख देईल निर्वाणी । चुकतील खाणी चौऱ्यांशीच्या ॥ध्रु.॥
आणिकिया जीवां होईल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥२॥
आहिक्य परत्रीं होसील सरता । वाचे उच्चारींता रामराम ॥३॥
तुका म्हणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥४॥

अर्थ

हे मानवा तू कसल्याही प्रकारची तळमळ करू नकोस तू निश्चळ राहा.अहो आमचा स्वामी कृपाळू आहे दया घन आहे.आपले मन तू स्थिर ठेव.आमचा विठ्ठल परमात्मा हा अविनाशी सुख देणारा आहे.त्यामुळे तू त्याचे चिंतन करशील तर तो तुला चौऱ्यांशीच्या खाणीतून वाचवील.त्यामुळे तुझा तर उध्दार होईलच पण इतरही जीवांचा तुझ्यामुळे उद्धार होईल आणि कोट्यावधी जीवांवर तुझे उपकार होतील.तू जर तुझ्या मुखाने रामराम नामाचा उच्चार करशील तर तुझा ऐहिक आणि पारलौकिक उद्धार होईल.या करता तू रामराम मंत्राचा जप करत जा.तुकाराम महाराज म्हणतात या संसाराचा छंद तू सोडून दे मग तुला परमानंद नक्कीच मिळेल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

न करीं तळमळ – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.