ऐक रे जना – संत तुकाराम अभंग – 808

ऐक रे जना – संत तुकाराम अभंग – 808


ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥१॥
मग कैचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण । येचि तीरी सरेल ॥ध्रु.॥
दास्य करील कळिकाळ । बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥
सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥
ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥
तुका म्हणे अनुभवें । आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें । सुख घेती भाविकें ॥५॥

अर्थ

हे लोकांनो तुमच्या स्वहिताची खूण तुम्हांला जाणायाची असेल तर त्या पांडुरंगाचे मनात स्मरण करत राहा.वाचेने तुम्ही जर कायम नारायणाचे गुणगान करात राहाल तर मग तुम्हाला कसले बंधन आले.भवसागर हा पैलतीरालाच नाहीसा होईल.सर्व काळी काळ तुमचे दास्यत्व करेल.मायाजळाचे तुमचे बंधन तुटेल,आणि रिद्धी सिद्धी तुमचे दास्यत्व करेल.विठ्ठलाचे नामस्मरण हे सर्व शास्त्रांचे सार आहे,आणि पुराणे देखील या नामस्मरणाचेच गुणगान गातात.नामस्मरण करण्याचा अधिकार हा सर्वांनाच असतो.मग तो ब्राम्हण असो,क्षत्रिय असो,वैश्य असो,शुद्र असो,चांडाळ किंवा बालक असो,नर असो,नारी असो एवढेच नाही वेश्यांना देखील या नामस्मरणाचा अधिकार आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आलेला अनुभव आम्ही तुम्हांला सांगत आहे,आणि जो कोणी दैववान भाग्यवान भाविक आहे तोच या नामस्मरणाचे सुख घेईल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

ऐक रे जना – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.