दुध दहीं ताक पशूचें – संत तुकाराम अभंग – 806
दुध दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥१॥
हेचि वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥
लोह कफ गारा अग्नीचिया काजें । येऱ्हवी तें ओझें कोण वाहे ॥२॥
तुका म्हणे खोरीं पाहारा जतन । जोंवरी हें धन हातीं लागे ॥३॥
अर्थ
दूध दही ताक हे मिळावे यासाठी लोक गाई-म्हशी इत्यादी पशूंचे पालनपोषण करतात परंतु या सर्व म्हणजे दही दूध ताक या सर्वांचे सार तूप आहे.त्याप्रमाणेच परमार्थामध्ये अनेक साधने आहेत परंतु सर्वांचे मुख्य सार म्हणजे रामाची नाम आहे व तेच आम्हा भक्तांच्या हाती तूप सारखे सारभूत असलेले राम नाम लागले आहे.म्हणून आम्ही त्याला चित्तात धरले आहे.लोखंड,गारगोटी,कापूस अग्नी उत्पन्न करण्यासाठी जवळ ठेवाव्यात नाही तर इतर वेळेस त्यांचे ओझे कोण वागवित बसेल? तुकाराम महाराज म्हणतात जो पर्यंत भूमीतील धन हाती लागत नाही तो पर्यंत आपल्याला टिकाव,पहार,घमेले यांची मदत घ्यावी लागते.म्हणजे रामाच्या प्राप्ती साठी आपल्याला नाम,जप,कीर्तन या साधनांची गरज लागते वर्माची प्राप्ती झाली कि मग या साधनांची गरज लागत नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
दुध दहीं ताक पशूचें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.