बरें झालें देवा निघालें – संत तुकाराम अभंग – 769

बरें झालें देवा निघालें – संत तुकाराम अभंग – 769


बरें झालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली ॥१॥
अनुतापें तुझें राहिलें चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ध्रु.॥
बरें जाले देवा बाईल कर्कशा । बरी हि दुर्दशा जन मध्ये ॥२॥
बरें जालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ढोरें गुरें ॥३॥
बरें जालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा ॥४॥
बरें जालें तुझें केलें देवाईल । लेंकरें बाईल उपेक्षिलीं ॥५॥
तुका म्हणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासीं जागरण ॥६॥

अर्थ

देवा बरे झाले माझे दिवाळे निघाले आणि दुष्काळानेही मला चांगलाच त्रास दिला आहे ते खूप चांगले झाले. देवा मला पश्चाताप येत आहे आणि त्या पश्चातापाच्या निमित्तानेच मला तुझे चिंतन घडत आहे आणि संसार तर मला ओकलेल्या अन्ना प्रमाणेच वाटत आहे संसाराची मला आता घृणा येत आहे. देवा बरे झाले मला बायको देखील कर्कश मिळाली आणि जगामध्ये देखील माझी दुर्दशा होत आहे हे देखील चांगले झाले .देवा जगामध्ये पावलोपावली माझा अपमान होत आहे हे देखील बरे झाले माझे गुरे-ढोरे धन हे सगळे गेले तेही चांगले झाले. देवा बरे झाले मी लोकलज्जा धरली नाही वेळेच तुला शरण आलो हे फार बरे झाले. देवा मी माझे सर्वस्व तुला अर्पण केले व बायकोचा लेकरांचा त्याग केला हे फार बरे झाले. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी एकादशीव्रत धरले त्या दिवशी उपवास धरला आणि हरीचे भजन करून जागरण केले हे फार बरे झाले.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

बरें झालें देवा निघालें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.