sarth tukaram gatha

याति शूद्र वैश केला – संत तुकाराम अभंग – 767

याति शूद्र वैश केला – संत तुकाराम अभंग – 767


याति शूद्र वैश केला वेवसाव । आधी तो हा देव कुळपूज्य ॥१॥
नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुह्मीं संतीं ॥ध्रु.॥
संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया ॥२॥
दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥३॥
लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां ॥४॥
देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥५॥
आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥६॥
कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियां ॥७॥
गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥८॥
संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥९॥
ठाकला तो कांहीं केला परउपकार । केलें हें शरीर कष्टवूनी ॥१०॥
वचन मानिलें नाहीं सुहृदांची । समूळ प्रपंचें वीट आला ॥११॥
सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१२॥
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामी ॥१३॥
यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥१४॥
निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१५॥
बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥१६॥
विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥१७॥
आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥
भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥
तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगें ॥२०॥

अर्थ

मी शुद्र असलो, माझा व्यवसाय हा शुद्र असला तरी मी या विठोबाला पूज्य देव मनाला आहे.खरे म्हणजे हि गोष्ट सांगण्याची नाहि,परंतु तुम्ही संतानी हा प्रश्न केला म्हणून मी उत्तर देतो.संसाराला मी खरे मानल्या मुळे अति दुखी झालो आहे,शेवटी माझे आई बापही मला सोडून गेले.दुष्काळाने गरिबी आली समाजातील मान संपला,पत्नी अन्ना अचून मरण पावली.सर्व बाजूने आलेल्या संकटाने मी अतिशय दुखी झालो,माझी मलाच लाज वाटू लागली या वेळी धंद्यात तुट होऊ लागली.देऊळ पडके झाले त्याचा जीर्णोद्धार करावे अशी इच्छा मनात होती.प्रारंभी मी एकादशीच्या दिवशी कीर्तन करायाल सुरुवात केली,परंतु कीर्तनाच्या अभ्यासात माझे लक्षच लागत नव्हते.मग मीच मनाला समजावले,संताची वचणे पाठ केली.कीर्तने मध्ये जे कोणी ईश्वराचे वर्णन हर्षाने करणारे होते,त्याच्या पाठी मागे उभा राहून मी धृवपद म्हणत असायचो.संतांचे चरण तीर्थ पीत असे त्याची मला लाज नाही.माझ्या हातून होईल तेवढे उपकार मी करत होतो इतरांची सेवा करत होतो.म्हणून माझ्या शरीराला त्रास होत होता.मी आता माझ्या नातेवाईकांची वचने खरी न मानता संतांची वचने खरी मानली.लोकांचा खोटे पणा पाहून मला त्यांचा वीट आला.खरे आणि खोटे काय मी माझे ठरविले.या बाबतीत लोक काय म्हणतात याचा मी विचार करत नव्हतो.स्वप्नात मला सद्गुरूने मला उपदेश केला त्याचा मी अंगीकार केला नामावर विश्वास ठेवला.नंतर मला अभंगाची स्पुर्ती हृदयातून झाली.हरीचे चरण कमल मी घट्टधरले.काही लोकांनी माझा निषेध केला माझ्यावर अनेक प्रकारचे घात केले.त्याने माझे मन दुखावले होते. मी लिहिलेल्या अभंगाच्या वह्या ह्या इंद्रायणी जळात बुडविल्या त्या वेळी मी तेरा दिवस तुमच्या जवळ धरणे धरून बसलो देवा,त्यावेळी तुम्ही माझे समाधान केले.आता मी सविस्तर जर सर्व सांगत राहिलो तर फार उशीर होईल देवा,आता पूरे झाले.आता आहे तसे आहे,पुढे काय होणार हे विठ्ठलाला माहित आहे.हा हरी माझ्या सारख्या भक्तांची कधी नुपेक्षा करणारा नाही हे मला माहित आहे,तो फार कृपावंत आहे हे हि मला कळले आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझे सर्व जीवन हे पांडुरंगच आहे,व इथे मी जे काही बोलतो आहे ते सर्व त्याच्या कृपेनेच बोलतो आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

याति शूद्र वैश केला – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *