यज्ञ भूतांच्या पाळणा – संत तुकाराम अभंग – 750
यज्ञ भूतांच्या पाळणा । भेद कार्य कारणा । पावावया उपासना । ब्रम्हस्थानीं प्रस्थान ॥१॥
एक परी पडिलें भागीं । फळ बीजाचिये अंगीं । धन्य तोचि जगीं । आदि अंत सांभाळी ॥ध्रु.॥
आवश्यक तो शेवट । येर अवघी खटपट । चालों जाणे वाट । ऐसा विरळा एखादा ॥२॥
तुका होवोनि निराळा । क्षराअक्षरावेगळा । पाहे निगमकळा । बोले विठ्ठलप्रसादें ॥३॥
अर्थ
यज्ञाने पाउस पडतो,त्यामुळे सर्व प्राणी मात्रांचे पालन पोषण होते हे कार्य कारणाचा संबंध असला तरी हरीची उपासना केली पाहिजे व जीवाने ब्रम्ह स्थिती प्राप्त केली पाहिजे.ईश्वर स्वरूपाचे बीज हे वेगवेगळ्या ठिकाणी वाटले गेले आहे,ते फळ अव्यक्त स्वरूपाचे असते.या फळाच्या व बीजाच्या आदी व अंती जो परमेश्वर आहे त्याचे अनंत रूप आहे तोच सांभाळ करणारा आहे व जो हरीची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करतो तो जगामध्ये धन्य आहे.हा श्रीहरी प्राप्त करून घेणे महत्वाचे आहे इतर खटपट हि व्यर्थ आहे त्या हरीशी एक्य पावणारा क्वचितच एखादा असतो.तुकाराम महाराज म्हणतात मी क्षर आणि अक्षर याहून वेगळा झालो आहे,विठ्ठलाच्या कृपाप्रसादानेच मी तुम्हाला उपदेश करत आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
यज्ञ भूतांच्या पाळणा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.