महुरा ऐसीं फळें – संत तुकाराम अभंग – 724

महुरा ऐसीं फळें – संत तुकाराम अभंग – 724


महुरा ऐसीं फळें नाहीं । आलीं कांहीं गळती ॥१॥
पक्वदशे येती थोडीं । नास आढी वेचे तो ॥ध्रु.॥
विरळा पावे विरळा पावे । अवघड गोवे सेवटीचे ॥२॥
उंच निंच परिवार देवी । धन्या ठावी चाकरी ॥३॥
झळके तेथें पावे आणी । ऐसे क्षणी बहु थोडे ॥४॥
पावेल तो पैल थडी । म्हणों गडी आपुला ॥५॥
तुका म्हणे उभाऱ्यानें । खरें कोण मानितसे ॥६॥

अर्थ

जेवढा आंब्याच्या झाडला मोहोर येतो तेवढी फळे येत नाही आणि जेवढी फळे येतात त्यातलीही काही गळून जातात.आढी तयार केल्यानंतर त्यातली काही फळे नासतात व थोडीच फळे पक्के होतात पिकतात.त्याच प्रमाणे परमार्थाच्या मार्गावरून चालणारे फार आहेत पण त्यातील काही च लोक हरीशी एकरूप होतात.अनेक प्रकारचे उच्च नीच लोक हे देवाच्या परिवारात आहे परंतु ज्या प्रमाणे धन्याला चाकराची माहिती असते त्या प्रमाणे ह्या धन्याला(देवाला)या चाकराची(आपली)माहिती असते कोण कशी सेवा करतो या कडे त्याचे पूर्ण लक्ष असते.जो खऱ्या भावार्थाने सेवा करतो त्यालाच यांची प्राप्ती होते त्याची कृपा होते.असे थोडेच लोक असतात कि त्यांना देवाची प्राप्ती होते.अश्या या शुध्द भक्तीने जो भवसागरातून पार होतो तोच आमचा खरा मित्र होय.तुकाराम महाराज म्हणतात नाही तर फक्त भक्तीचा डामडौल करणाऱ्याला त्याच्या भक्तीला कोण मानेल?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

महुरा ऐसीं फळें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.