कृपाळु म्हणोनि बोलती – संत तुकाराम अभंग – 688
कृपाळु म्हणोनि बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचीं मज ॥१॥
आणीक उपाय नेणेंचि कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे तैसें ॥ध्रु.॥
नये धड कांहीं बोलतां वचन । रिघालों शरण सर्वभावें ॥२॥
कृपा करिसी तरि थोडें तुज काम । माझा तरि श्रम बहु हरे ॥३॥
तुका म्हणे मज दाखवीं श्रीमुख । हरेल भूक या डोळियाची ॥४॥
अर्थ
हे प्रभू मला या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे कि पुराणातही असेच सांगितले आहे कि,तुम्ही फार कृपाळू आहात.तुझे वर्म मला कळेल असा उपाय मला माहित हि नाही आणि मी जाणतहि नाही.मला साधे नुसते धड काही नीट बोलताही येत नाही म्हणून मी तुम्हाला सर्व भावे शरण आलो आहे.हे प्रभू तुम्ही माझ्यावर थोडा जरी कृपेचा वर्षाव केला तरी तुमच्यासाठी हे काही मोठे काम नाही,माझे मात्र पुष्कळ श्रम वाचतील.तुकाराम महाराज म्हणतात हे हरी तू मला तुझे श्रीमुख दाविले तर माझ्या डोळ्यांची भूक हरेल.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कृपाळु म्हणोनि बोलती – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.