सर्प भुलोन गुंतला – संत तुकाराम अभंग – 675
सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे ।
हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥१॥
तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडवी आतां ।
माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा हे तुज न करितां ॥ध्रु.॥
आविसें मिन लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणोनियां ।
काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापमाये कवण रया ॥२॥
पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा गुंते बळें ।
मरण सायासे नेणें माया धांवोनि वोसरे । जीवित्वा नास जालीं बाळें ॥३॥
गोडपणें मासी लिगाडीं गुंतली । सांपडे फडफडी अधिकाधिक ।
तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घालीं ॥४॥
अर्थ
गारुड्याने पुंगी वाजविली तर सर्प त्या आवाजाला भुलून जातो,त्या वेळी गारुडी पाश टाकून सर्पाला पकडतो मग तो त्याला पेटाऱ्यामध्ये घेऊन दारोदारी हिंडतो व आपले पोट भरतो.सर्प बरोबर गुंतून जातो पांडुरंग माझी पण अशीच अवस्था झाली आहे मी या संसार पशामध्ये पूर्ण गुंतून गेलो आहे.माझ्यावर कृपा करून मला यातून सोडवा.माझे काहीच चालत नाही.देवा तुझी माझ्यावर कृपा नाही त्यामुळे मी यामध्ये आधीच गुंतलो आहे यातून मी बाहेर पडतच नाही त्यामुळे तू माझ्यावर कृपा कर.मासा पकडण्यासाठी गळ्याच्या टोकाला माशाला आमिष म्हणून काहीतरी लावले जाते आणि त्या आमिषाला भुलून तो मासा त्या गाळाला अडकतो.पाण्यातील मासा ते आपले भक्ष आहे असे समजू त्याला धरण्याचा प्रयत्न करतो तो कोळीच्या ताब्यात सापडतो.कोळी त्याला बाहेर काढतो.तो तडफडतो.त्यावेळी त्याचे रक्षण करणारे कोण आई बाप आहे.पिलाला त्याचे आई वडील घरट्यात ठेऊन बाहेर जातात परत येऊन पाहतात पारध्याच्या पाशात पिले सापडलेली असतात.पिलांच्या प्रेमामुळे पारध्याच्या जाळ्यात पक्षीण स्वतःला पारध्याच्या जाळ्यात अडकून घेते व आपले जीवन संपवते.तुकाराम महाराज म्हणतात चिकट गुळावर माशी जाऊन बसते तेंव्हा तिचे पाय तेथे गुंतून रहातात.तेंव्हा उडण्यासाठी प्रयत्न केल्याने पंखाच्या फडफडण्याने पाय अधिकच गुंतून जातात.तेंव्हा हे पंढरीनाथा आता तू धावत ये या संसार पाशातून सोडव.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
सर्प भुलोन गुंतला – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.