जळो माझी ऐसी बुद्धी – संत तुकाराम अभंग – 631

जळो माझी ऐसी बुद्धी – संत तुकाराम अभंग – 631


जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधीं । आवडी हे विधि । निषेधींच चांगली ॥१॥
तूं स्वामी मी सेवक । उंच पद निंच एक । ऐसें करावें कौतुक । नको करूं खंडणा ॥ध्रु.॥
जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोक्ता तो निराळा । तेणें गोडी निवडिली ॥२॥
हिरा शोभला कोंदणें । अळंकारीं मिरवे सोनें । एक असतां तेणें । काय दुजें जाणावें ॥३॥
उष्णें छाये सुख वाटे। बाळें माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥४॥
तुका म्हणे हित । हेंचि मानी माझें चित्त । नव्हे आतां मुक्त । ऐसा जाला भरवसा ॥५॥

अर्थ

तुझ्या मध्ये मी एकरूप व्हावे,अशी माझी बुद्धी असेल तर त्या बुद्धीला आग लागो.मला विधी निषेधाचे पालन करणे याविषयीच आवड आहे.हे देवा,तू माझा स्वामी आहे आणि मी तुझा सेवक आहे.तू उच्च पदावर आणि आम्ही खाली असावे असे तू कौतुक तू करावे,ह्यात काही भेद नसावा.पाणी पाण्यास कधी पीत नाही,वृक्ष कधी आपली फळे खात नाही.त्याला खाणारा म्हणजे त्याचा भोक्ता हा वेगळा असतो,तो त्याचि गोडी जाणतो.हिरा हा कोंदणात शोभून दिसतो.सुवर्णाची शोभा दागिन्याच्या रूपाने दिसते.या प्रमाणे सर्व व्यवहार भेदात होतात.जर ते एकच असेल,तर दुसरे कसे बरे जाणावे?उन्हात तापल्यावर थंडगार सावलीत सुख लाभते.बालकाच्या योगाने आईला पान्हा फुटतो.एकाला दुसरे न भेटता त्यांना सुख कसे प्राप्त होईल?तुकाराम महाराज म्हणतात असे वेगळे राहण्यातच मला हित वाटते.मी तुझ्याशी एकरूप होऊन मुक्त होणार नाही.एकत्व जाणून आणि त्याचा अनुभव घेऊन,तू देव आणि मी भक्त बनून मी सदैव तुझ्यावर निस्वार्थ प्रेम करत राहणार आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जळो माझी ऐसी बुद्धी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.