वाट वैकुंठीं पाहाती – संत तुकाराम अभंग – 579

वाट वैकुंठीं पाहाती – संत तुकाराम अभंग – 579


वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥१॥
धन्यधन्य हरीचे दास । तयां सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तीर्थवास भेटीची ॥ध्रु.॥
कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रंदिवस । वाट कर जोडोनि ॥२॥
रिद्धिसिद्धी न पाचारितां । त्या धुंडिती हरीभक्तां । मोक्ष सायुज्यता । वाट पाहे भक्तांची ॥३॥
असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीक ही उद्धरिले । महादोषी चांडाळ ॥४॥
सकळ करिती त्यांची आस । सर्वभावें ते उदास । धन्यभाग्य त्यांस । तुका म्हणे दर्शने ॥५॥

अर्थ

भू लोकातील भक्तजन वैकुंठामध्ये केव्हा येतील अशीच वैकुंठातील लोक वाट पाहत असतात.परंतु भक्तांच्या मनामध्ये जन्ममरणाची खंत नसते आणि वैकुंठाची किंवा परलोकाची चिंताही नसते.खरोखर हरीचे दास अतिशय धन्य आहेत कारण त्यांना जन्म-मरणाचा गर्भवास देखील सुलभ वाटतो कारण जन्माला येऊन त्यांना हरीचे नाम घेण्यास मिळते.ब्रह्मादिक देव सुद्धा वैष्णवांची देवाच्या भक्तांची असं करतात इच्छा करतात तीर्थ-क्षेत्र देखील त्यांच्या भेटीसाठी इच्छा मनात धरतात.त्यांच्या मुखाने हरी कथा श्रवण करायला मिळावी म्हणून यम धर्म देखील मोठी इच्छा धरून असतो.आणि भक्तांची रात्रंदिवस हात जोडून तो वाट पाहत असतो.हरी भक्तांना धुंडाळीत धुंडाळीत रिद्धी सिद्धी देखील न बोलताच हरिभक्तां जवळ जाते.सायुज्य मुक्तीही भक्तांची वाट पाहत असते.हरी भक्त जेथे कोठे असतात,तेथे ते हरीच्या प्रेमसुखाने नेहमी सुखी असतात.आणि आपल्या संगतीने इतर दोषी महादोषी चांडाळानाही उद्धरून नेतात.तुकाराम महाराज म्हणतात सर्वजण त्यांना भेटण्याची आशा धरतात.पण हरिदास सर्व बाबतीत उदास असतात त्यांचे दर्शन ज्या कोणालाही होते ते खरोखर धन्य आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

वाट वैकुंठीं पाहाती – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.