गंगेचिया अंतेविण काय – संत तुकाराम अभंग – 518
गंगेचिया अंतेविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं ॥१॥
विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर । घालूं निरंतर हृदयपुटीं ॥ध्रु.॥
कारण तें असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी येर कोण ॥२॥
बाळाचे सोईतें घांस घाली माता । अट्टाहास चिंता नाहीं तया ॥३॥
गाऊं नाचू करूं आनंदसोहळा । भावचि वेगळा नाहीं आतां ॥४॥
तुका म्हणे अवघें जालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥५॥
अर्थ
ज्याला तहान लागलेली आहे त्याने शांत चित्ताने गंगेचे पाणी प्यावे गंगेचे पाणी किती खोल असेल अश्या निरर्थक चौकशी करत बसू नये.त्या प्रमाणे बाह्य गोष्टींचा फार विचार न करता विठ्ठलाची साजिरी गोजिरी मनमोहक मूर्ती हृदय मंदिरात स्थिर करावी.लोणी हे सार असे नवनीत असते त्याच्याशी आपला संबंध.इतर गबाळ्या गोष्टींचा विचार करू नये.बाळाच्या सोई साठी आई त्याला घास भरवित असते बाळाला मात्र कसली चिंता किंवा खटाटोप करण्याची जरुरी नसते.त्या प्रमाणे आम्ही या विठ्ठलाच्या प्रेमात नाचु गाऊ व आंनदाने सुखाचा सोहळा संपन्न करू.या खेरीज आमच्या मनात दुसरा कोणताही भाव नसतो.तुकाराम महाराज म्हणतात आता आमचे सारे जीवनच ईश्वर मय झाल्यामुळे आम्हाला आता परलोकाची अपेक्षा राहिली नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
गंगेचिया अंतेविण काय – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.