न कळे तो काय – संत तुकाराम अभंग – 502

न कळे तो काय – संत तुकाराम अभंग – 502


न कळे तो काय करावा उपाय । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥१॥
येऊनियां वास करिसी हृदयीं । ऐसें घडे कई कासयाने ॥ध्रु.॥
साच भावें तुझें चिंतन मानसी । राहे हें करिसी कैं गा देवा ॥२॥
लटिकें हें माझें करूनियां दुरी । साच तूं अंतरीं येउनि राहें ॥३॥
तुका म्हणे मज राखावें पतिता ।आपुलिया सत्ता पांडुरंगा ॥४॥

अर्थ

देवा तुझ्या पायाच्या ठिकाणी माझा भक्तिभाव स्थिर रहावा असा उपाय कोणता करावा तेच मला काही कळेना. देवा तु माझ्या हृदयामध्ये येऊन वास्तव्य करशील असे केव्हा कधी आणि कोणत्या उपायाने घडेल? देवा खऱ्या भक्तिभावाने माझ्या मनामध्ये तुझेच चिंतन राहील अशी माझी स्थिती तू केव्हा करशील? देवा या संसारातील सर्व खोट्या गोष्टी माझ्यापासून तू दूर कर व माझ्या अंतरंगात येऊन राहा. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुझ्या सत्तेने माझ्यासारख्या पतीताचा सांभाळ करावा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

न कळे तो काय – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.