कां हो येथें काळ आला – संत तुकाराम अभंग – 491

कां हो येथें काळ आला – संत तुकाराम अभंग – 491


कां हो येथें काळ आला आम्हां आड । तुम्हांपाशीं नाड करावया ॥१॥
कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें कोडें उपजलें ॥ध्रु.॥
कां हो उपजेना द्यावी ऐशी भेटी । काय द्वैत पोटीं धरिलें देवा ॥२॥
पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल तें बळ नाहीं आतां ॥३॥
काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ॠणा पायीं ॥४॥
तुका म्हणे कां रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडुनि ॥५॥

अर्थ

अहो देवा तुमची आणि माझी भेट होण्याच्या वेळी हा काळ भेटीच्या आडवा तरी का आला असेल?देवा अहो मला भेट देण्याविषयी तुम्ही इतका विचार का करतात आणि मला वेळ देण्याविषयी तुम्हाला असे कोणते संकट निर्माण झाले आहे?अशी कोणती अडचण आली आहे,आम्हाला भेटावे असे तुम्हाला का वाट नाही?आमच्या विषयी मनात दुजाभाव धरला काय?आमचे पाप वाढले आहे की काय किंवा तु दुर्बळ झाला आहेस की काय किंवा मागे जसे तुझ्या अंगी बळ होते तसे बळ तुझ्या अंगी आता राहिले नाही की काय?तुम्हाला देणे झाले म्हणून तुमचे दिवाळे निघाले काय?कि सावकाराने ऋण वसूल करण्यासाठी तुम्हाला बांधून ठेवले आहे?तुकाराम महाराज म्हणतात अरे तुझा आणि माझा ठेवीचा व्यवहार तू वेगळा केलास आणि आता कोठे गुंतलास?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

कां हो येथें काळ आला – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.