जंववरी नाहीं देखिली – संत तुकाराम अभंग – 446
जंववरी नाहीं देखिली पंढरी । वर्णिसी थोर वैकुंठींची ॥१॥
मोक्षसिद्धी तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीनरूप ॥ध्रु.॥
वृंदावन सडे चौक रंग माळा । अभिनव सोहोळा घरोघरीं ॥२॥
नामघोष कथापुराणकीर्तनीं । ओविया कांडणीं पांडुरंग ॥३॥
सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रम्ह तें केवळ नांदतसे ॥४॥
तुका म्हणे जें न साधे सायासें । प्रत्यक्ष तें दिसे विटेवरी ॥५॥
अर्थ
जोपर्यंत प्रत्यक्ष डोळ्यांनी पंढरपुराचे दर्शन घेतले नाही तोपर्यंतच वैकुंठाची थोरवी तू गाशील.अहो पंढरीमध्ये मोक्ष तसेच सिद्धी हे दिन पणाने दारोदारी हिंडत आहेत काम करणार्या दासी प्रमाणे त्यांची अवस्था झालेली आहे,इथे घरोघरी तुळशी वृन्दावने आहेत.रस्ते झाडून,साडे घालून रांगोळ्या काढल्या आहेत.घरोघर अभिनव सोहळा आहे.इथे कथा पुराणे कीर्तन,नाम घोष होत आहे.दळण कांडन करतांना स्रिया पांडुरंगाला आळवून ओव्या म्हणत आहे.इथे सर्वदा सर्व सुख असून मूर्ती मंत ब्रम्ह इथेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात मोठ्या सायासाने सुद्धा ज्याची प्राप्ती होत नाही ते ब्रम्ह विटेवर प्रत्यक्ष उभे आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
जंववरी नाहीं देखिली – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.