जेणें तुज जालें रूप – संत तुकाराम अभंग – 425
जेणें तुज जालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आम्ही ॥१॥
नाहीं तरी तुज कोण हो पुसतें । निराकारी तेथें एकाएकी ॥ध्रु.॥
अंधारे दीपा आणियेली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणाची ॥२॥
धन्वंतरी रोगें आणिला उजेडा । सुखा काय चाडा जाणावें त्या ॥३॥
अमृतासी मोल विषाचिया गुणें । पितळें तरी सोनें उंच निंच ॥४॥
तुका म्हणे आम्ही असोनिया जान । तुज देव पणा आणियेलें ॥५॥
अर्थ
देवा पतीता करताच तुला नाम रूपाला यावे लागले म्हणजेच याचा अर्थ असा होतो की, आम्ही पतीतच खरे तुझे दैवत आहोत.नाही तर तू निराकार स्वरुपस्थितीने असतास तर तुला कोणी मानले असते.आंधरानेच दिव्याच्या प्रकाशाला शोभा आणली आहे व कोणंदणाच्या योगाने माणिक शोभून दिसते.वैद्याला रोगा मुळेच प्रसिद्धी मिळते.जर सर्व सुखी निरोगी असते,तर वैद्याकडे जाण्याचे कोणाला काय कारण होते?विषा मुळेच अमृताला मोल चढते आणि पितळ हा धातू हलका आहे म्हणून सोन्याला श्रेष्टता प्राप्त झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात अरे विठ्ठला,आम्हीं असे पतित असल्यामुळेच तुला देवपणाचा मोठेपणाला आणले आहे हे तू समजून राहा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
जेणें तुज जालें रूप – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.