नाहीं साजत हो मोठा ।
मज अळंकार खोटा ॥१॥
असें तुमचा रजरेण ।
संतां पायीं वाहाण ॥ध्रु.॥
नाहीं स्वरूपीं ओळखी ।
भक्तीभाव करीं देखीं ॥२॥
नाहीं शून्याकारीं ।
क्षर ओळखी अक्षरीं ॥३॥
नाहीं विवेक या ठायीं ।
आत्मा अनात्मा काई ॥४॥
कांहीं नव्हें तुका ।
पांयां पडने हें ऐका ॥५॥
अर्थ
हे संत हो तुम्ही मला दिलेला सन्मानरूपी अलंकार हा खूप मोठा आहे पण तो अलंकार मला शोभत नाही.अहो मी तर तुमच्या पायाच्या धुळीचा कण आहे तुमच्या पायाची वाहन आहे.मला तुमच्या सारखी ब्रम्हस्वरूपाची ओळख नाही पण दुसऱ्याचा भक्तीभाव पाहून तसा वागत आहे.मला शून्याकार भाव म्हणजे समाधी अवस्था समजत नाही तसेच क्षर व अक्षर हेही मला समजत नाही.आत्मा व अनात्मा याचा विवेक माझ्या चित्तात शिरत नाही.तुकाराम महाराज म्हणतात मला काहीही कळत नाही समजत नाही हे मात्र नक्की पण मला मात्र एक समजते की तुमच्या संतांच्या चरणांवर लोटांगण घ्यावे तुमचे दर्शन घ्यावे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.