कोण त्याचा पार पावला धुंडितां ।
पुढें विचारितां विश्वंभरा ॥१॥
अणुरेणु सूक्षमस्थूळा पार नाहीं ।
श्रुती नेती त्या ही खुंटलिया ॥ध्रु.॥
फळांत कीटक येवढें आकाश ।
ऐसीं तरुवरास अनेक किती ॥२॥
दाविलें अनंतें अर्जुनासि पोटीं ।
आणीक त्या सृष्टि कृष्णलोक ॥३॥
तुका म्हणे लागा संतांचिये कासे ।
ठाव घेतां कैसे वांचा जीवें ॥४॥
अर्थ
या विश्वंभरा चा कोणी कितीही विचार केला किंवा त्याच्यावर कोणी कितीही आभ्यास केला तरी त्याचा शेवट कोणालाही लागलेला नाही.तो परमात्मा अणु रेणू पेक्षा हि सूक्ष्म आहे आणि स्थूल पदार्थापेक्षा ही अतिस्थूल आहे व वेदही त्याविषयी विचार करून शेवटी त्याचे वर्णन करता येत नाही असे म्हणू लागले.एका फळात अनेक कीटके असतात त्यांच्यासाठी त्या फळा येवढेच त्यांचे आकाश असते असे फळ एका झाडाला किती असतात असे झाड या भूतलावर किती असतात? या अनंताने आपल्या उदरात अर्जुनाला अनेक गोष्ट अनेक सृष्टी अनेक कृष्ण अनेक लोक दाखविले.तुकाराम महाराज म्हणतात याकरिता तुम्ही संतांची कास धरा तसे न करता तुम्ही जर अनंताचा शोध घेण्यास निघाल तर तुमचा जीव कसा वाचेल त्यामुळे संतांची कास धरून तुम्ही परमात्म्याचा शोध करा म्हणजे तुम्हीही परमात्मरूप व्हाल.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.