परमेष्ठिपदा – संत तुकाराम अभंग – 291
परमेष्ठिपदा ।
तुच्छ मानिती सर्वदा ॥१॥
हेंचि ज्यांचें धन ।
सदा हरीचें स्मरण ॥ध्रु.॥
इंद्रपदादिक भोग ।
भोग नव्हे तो भवरोग ॥२॥
सार्वभौमराज्य ।
त्यांसि कांहीं नाहीं काज ॥३॥
पाताळींचें आधिपत्य ।
ते तों मानिती विपत्य ॥४॥
योगसिद्धिसार ।
ज्यासि वाटे तें असार ॥५॥
मोक्षायेवढें सुख ।
सुख नव्हेचि तें दुःख ॥६॥
तुका म्हणे हरीविण ।
त्यासि अवघा वाटे सिण ॥७॥
अर्थ
परमपदाला देखील हरिभक्त तुच्छ मानतात.त्यांचे धन म्हणजे सदा सर्वकाळ हरीचे चिंतन करणे होय.त्यांना इंद्रपद म्हणजे भोग नाही तर भवरोग वाटते.सार्वभौम राज्य जरी असले तरी त्यांना त्याच्याशी काहीही कर्तव्य नसते.पाताळातील अधिपत्य म्हणजे अंगावर आपत्ती ओढून घेणे असे ते मानतात.योग केल्यावर त्यात सिद्धी प्राप्त होतात त्या सिद्धी तर भक्तांना असार वाटतात.मोक्षा सारखे सुख देखील त्यांना दुख वाटते.तुकाराम महाराज म्हणतात हरी वाचून त्यांना सर्व शीण वाटतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
परमेष्ठिपदा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.