सकळ चिंतामणी शरीर – संत तुकाराम अभंग – 28
सकळ चिंतामणी शरीर ।
जरी जाय अहंकार समूळ आशा ॥
निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि ।
निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥
मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी ।
येती तयापासीं अवघीं जनें ॥
तीर्थांसी तीर्थ जाला तोचि एक ।
मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु.॥
मन शुद्ध तया काय करिसी माळा ।
मंडित सकळा भूषणांसी ॥
हरिच्या गुणें गर्जताती सदा ।
आनंद तया मानसीं ॥२॥
तन मन धन दिलें पुरुषोत्तमा ।
आशा नाहीं कवणाची ॥
तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा ।
काय महिमा वर्णूं त्याची ॥३॥
अर्थ
त्यांचेच शरीर चिंतामणी आहे ज्यांच्या शरीरातून अहंकार, आशा हे समूळ नाहीसे झाले आहेत. ज्यांच्या शरीरातुन निंदा, हिंसा, कपट, देहबुद्धी नाहीशी झाली तो अगदीच स्फटिका प्रमाणे निर्मळ आहे जसा स्फटिक मनी असतो अगदी त्याप्रमाणे तो मनुष्य आहे. मोक्षाची प्राप्ती करुन देणारे काशी या तीर्थक्षेत्री सुद्धा त्याला जाण्याची गरज नाही सर्व काही त्याच्याजवळ आपोआप येते, कारण तो स्वतःच तीर्थक्षेत्र झालेला असतो आणि त्याच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. अहो ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला माळ मुद्राचे बाह्य भूषण काय करायचे आहे कारण त्याचे अंतरंगाचं शुद्ध झाले असते त्यामुळे तो त्याच भूषणने मंडित झालेला असतो. हरीचे गुण गर्जुन वर्णन करतात इतरांना सांगतात ते स्वतःच्या मनाने आनंदित असतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने आपले तन मन आणि धन हे सर्व पुरुषोत्तमाला दिले व ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, तो मनुष्य परीसा होऊनही वेगळा आहे त्याचा महिमा कसा वर्णन करावा?
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
सकळ चिंतामणी शरीर – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.