जरी माझी कोणी कापितील मान ।
तरी नको आन वदों जिव्हे ॥१॥
सकळां इंद्रियां हे माझी विनंती ।
नका होऊं परतीं पांडुरंगा ॥ध्रु.॥
आणिकांची मात नाइकावी कानीं ।
आणीक नयनीं न पाहावें ॥२॥
चित्ता तुवां पायीं रहावें अखंडित ।
होउनी निश्चित एकविध ॥३॥
चला पाय हात हेचि काम करा ।
माझ्या नमस्कारा विठोबासी ॥४॥
तुका म्हणे तुम्हां भय काय करी ।
आमुचा कैवारी नारायण ॥५॥
अर्थ
हे जिव्हे पांडुरंगा वाचून दुसरे कोणतीही नाम घेण्यासाठी कोणीही मला जबरदस्ती केली किंवा माझी मान जरी कापली तरी तू पांडुरंगा वाचून दुसरे काहिहि उच्चार करू नकोस.सर्व इंदियांना माझी विनंती आहे कि तुम्ही पांडुरंगाविषयी विन्मुख होऊ नका.माझ्या कानांनी या हरिनामा वाचूनच दुसरे काहीही ऐकू नये व माझ्या डोळ्यांनीही या पांडुरंग वाचून दुसरे काहिहि पाहू नये.हे माझ्या “चित्ता” तू सर्व काही चिंता टाकून एकविध मनाने एकनिष्ठ भावनेने या पांडुरंगाच्या चरणी अखंड राहा.हे माझ्या पायानो तुम्ही या विठोबाकडे चालत राहा आणि हे माझ्या हातांना तुम्ही या विठोबाला कायमस्वरूपी नमस्कार करत राहा.तुकाराम महाराज म्हणतात मग तुम्हाला कसलेही भय काय करणार आहे कारण आमचा कैवारी नारायण आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.