न व्हावें तें जालें देखियेले पाय ।
आतां फिरूं काय मागें देवा ॥१॥
बहुत दिस होतों करीत हे आस ।
तें आलें सायासें फळ आजि ॥ध्रु.॥
कोठवरी जिणें संसाराच्या आशा ।
उगवो हा फांसा येथूनियां ॥२॥
बुडले तयांचा मूळ ना मारग ।
लागे तो लाग सांडूनियां ॥३॥
पुढें उल्लंघितां दुःखाचे डोंगर ।
नाहीं अंतपार गर्भवासा ॥४॥
तुका म्हणे कास धरीन पीतांबरीं ।
तूं भवसागरीं तारूं देवा ॥५॥
अर्थ
हे देवा तुमचे चरण दर्शन होणे फार दुर्मिळ ते होणे शक्य नव्हते पण आता ते दर्शन मला झाले मग मी मागे कसा फिरू?ज्या गोष्टीची मला आस होती इच्छा होती ती गोष्ट मला सायासाने मिळाली आहे.या संसाराची आशा किती दिवस धरावी तुमच्या दुर्मिळ चरणांचे दर्शन झाले या चरणांच्या आश्रयाने मी संसाराचा फासा तोडून टाकीन.या संसार रुपी सागरात बुडालेल्या लोकांचा मागमूस देखील नाही.या नर देहाला दुखाचे डोंगर गर्भवास भोगावे लागते.तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या पितांबराची कास धरीन कारण तुम्हीं मला या भाव सागरातून तरून नेणारे आहात.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.