भवसागर तरतां – संत तुकाराम अभंग – 203
भवसागर तरतां ।
कां रे करीतसां चिंता ।
पैल उभा दाता ।
कटीं कर ठेवुनियां ॥१॥
त्याचे पायीं घाला मिठी ।
मोल नेघे जगजेठी ।
भावा एका साठीं ।
खांदां वाहे आपुल्या ॥ध्रु.॥
सुखें करावा संसार ।
न संडावे दोन्ही वार ।
दया क्षमा घर ।
चोजवीत येतील ॥२॥
भुक्तिमुक्तिची चिंता ।
दैन्य नाहीं दरिद्रता ।
तुका म्हणे दाता ।
पांडुरंग वोळगिल्या ॥३॥
अर्थ
हे जनहो, हा भवसागर तरुण जाण्याची चिंता तुम्ही निष्कारण का करता ? तुम्हाला पार करणारा तो सर्वशक्तिमान विठ्ठल पैलतीरावर हात कटावर ठेऊन तत्परतेने उभा आहे .त्यासाठी त्याला कोणतेही मोल द्यावे लागत नाही, फक्त भक्तीभावाने त्याच्या पायी मीठी घाला, तो तुम्हाला विनामोबादला आपल्या खांद्यावर घेईल .त्याला फक्त तुम्ही भक्तीभाव व आपले चित्त अर्पण केले की मग खुशाल संसार सुखाने करा, दोन वारी(आषाढी व कार्तिकी) चुकवु नका.मग दया क्षमा चालत तुमच्या घरी येतील .तुकाराम महाराज म्हणतात, या पांडुरंगा दात्याची जर तुम्ही भक्ती कराल तर दारिद्रय येणार नाही, मुक्तीची चिंता तुम्हाला त्रास देणार नाही .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
भवसागर तरतां – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.