जया दोषां परीहार – संत तुकाराम अभंग – 189
जया दोषां परीहार ।
नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र ।
ते हरती अपार ।
पंढरपुर देखिलिया ॥१॥
धन्य धन्य भीमातीर ।
चंद्रभागा सरोवर ।
पद्मातीर्थी विठ्ठल वीर ।
क्रीडास्थळ वेणुनादीं ॥ध्रु.॥
सकळतीर्थांचें माहेर ।
भूवैकुंठ निर्विकार ।
नामाचा गजर ।
असुरकाळ कांपती ॥२॥
नाहीं उपमा द्यावया ।
सम तुल्य आणिका ठाया ।
धन्य भाग्य जयां ।
जे पंढरपूर देखती ॥३॥
उपजोनि संसारीं ।
एक वेळ पाहें पा पंढरी ।
महा दोषां कैची उरी ।
देवभक्त देखिलिया ॥४॥
ऐसी विष्णूची नगरी ।
चतुर्भुज नर नारी ।
सुदर्शन घरटी करी ।
रीग न पुरे कळिकाळा ॥५॥
तें सुख वर्णावया गति ।
एवढी कैची मज मति ।
जे पंढरपुरा जाती ।
ते पावती वैकुंठ ॥६॥
तुका म्हणे या शब्दाचा ।
जया विश्वास नाहीं साचा ।
तो अधम जन्मांतरिचा ।
जया पंढरी नावडे ॥७॥
अर्थ
काही पातके अशी आहेत, की शास्रे काढून पाहिले तरी त्यां पातकांचा परिहार होण्यासाठी प्रायचित्त मिळत नाही.परंतु पंढरीचे दर्शन घेतले की , घोर अशी पातके नाहीशी होतात .धन्य ते भिमातिर ! धन्य ते चंद्रभागा तीर्थ ! पद्मतीर्थाच्या ठिकाणी विठ्ठलवीर राहत असून ते वेणुनादाचि क्रीडा करतात.ती सर्व स्थान धन्य होत .पंढरी हे सर्व तीर्थाचे माहेर आहे.भूतलावरि वैकुंठ आहे.तेथे सतत नामगजर चालु असतो.तो एकूण असुर, काळही भीतीने कापतात .त्याला उपमा देण्यास दूसरे स्थळ नाही.ज्यांनी पंढरपुराचे दर्शन घेतले ते धन्य होतात .जगात जन्माला येऊन एकदातारि पंढरी पाहावि.देवभक्ताचे (पुंडलीकाचे) दर्शन घेतल्यानंतर महापातकांना जागा कशी उरेल ? अशी ही विष्णुची नगरी आहे.येथील नर-नारी चतुर्भुज आहेत.सूदर्शनाचे फेरे त्यांच्या भोवती सुरु असतात.त्यामुळे कळीकाळाला तेथे प्रवेश नाही .तेथील सुखाचे वर्णन करण्यास माझी बुद्धि असमर्थ आहे.जे पंढरपुरला जातात, त्यांना प्रत्यक्ष वैकुंठच् पावते .तुकाराम महाराज म्हणतात, या शब्दांवर ज्याचा विश्वास नाही,ज्याला पंढरी आवडत नाही, तो जन्म जन्मांतरिचा अधम होय .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
जया दोषां परीहार – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.