गरुडाचें वारिके कासे पीतांबर ।
सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥
बरविया बरवंटा घनमेघ सांवळा ।
वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥
मुगुट माथां कोटि सूर्यांचा झल्लाळ ।
कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥
ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ ।
वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥
उद्धव अक्रूर उभे दोहींकडे ।
वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा ।
तोचि माझा सखा पांडुरंग ॥५॥
अर्थ
गरुडरूपी अश्वावर आरूढ झालेले, कमरेला पीतांबर नसलेले, मोहक असे हे सावळे सुंदर रूप मी केव्हा पाहीन? उत्तमात उत्तम असे मेघासारखे श्यामल हे रूप आहे गळ्यात वैजयंती माळा शोभत आहे .त्याने मस्तकावर कोटि सूर्याच्या तेज्याप्रमाणे झळकणारा मुकुट घातला आहे, गळ्यात कौस्तुभमणी शोभुन दिसत आहे.सर्व सुखांनी युक्त असे हे सुंदर रूप असून, त्याच्या डाव्या बाजूला अतिशय सुंदर अशी रखुमाई आहे .त्याच्या दोन्ही बाजूस उद्धव व अक्रूर हे उभे आहेत सनकादिक त्याच्या किर्तीचे गुणगान करत आहेत .तुकाराम महाराज म्हणतात, जो इतर कोणासारखाहि नाही ऐसा ईश्वर माझा सखा पांडुरंग आहे .
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.