एकादशीस अन्न पान – संत तुकाराम अभंग – 170

एकादशीस अन्न पान – संत तुकाराम अभंग – 170


एकादशीस अन्न पान ।
जे नर करिती भोजन ।
श्वानविष्ठे समान ।
अधम जन तो एक ॥१॥
ऐका व्रताचें महिमान ।
नेमें आचरती जन ।
गाती ऐकतीं हरीकीर्तन ।
ते समान विष्णूशीं ॥ध्रु.॥
अशुद्ध विटाळसीचें खळ ।
विडा भिक्षतां तांबूल ।
सांपडे सबळ ।
काळाहातीं न सुटे ॥२॥
सेज बाज विलास भोग ।
करी कामिनीचा संग ।
तया जोडे क्षयरोग ।
जन्मव्याधी बळिवंत ॥३॥
आपण न वजे हरीकीर्तना ।
अणिकां वारी जातां कोणा ।
त्याच्या पापें जाणा ।
ठेंगणा तो महामेरु ॥४॥
तया दंडी यमदूत ।
झाले तयाचे अंकित ।
तुका म्हणे व्रत ।
एकादशी चुकलीया ॥५॥

अर्थ
एकादशीला भोजन करणारे अधम आहेत; ते खात असलेले अन्न कुत्र्याच्या विष्टे प्रमाणे आहे . एकादशी व्रताचे महत्त्व असे आहे की जे कोणी हे व्रत करतील, हरिकीर्तन करतील ते विष्णुसमान आहेत .एकादशीला जो पाणाचा विडा खाईल त्याने विटाळशीचा स्त्राव खाल्ल्याप्रमाणे होईल.त्याला काळ खाऊन टाकिल .या व्रताच्या दिवशी जो पत्नीशी व अन्य स्त्रीशी संग करेल, विविध प्रकारचे भोग घेईल, त्याला क्षय-महारोगासारख्या व्याधी जडतील .या दिवशी जो हरिकीर्तन करत नाही व इतरांनाही करू देत नाही तो पर्वता एवढ्या पापाचा धनी होतो, त्याच्या पापापुढे मेरु पर्वतही लहान वाटतो .तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक एकादशी व्रत करत नाही ते शिक्षेस पात्र आहेत व त्यांना यमदूत शिक्षा देतो .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


एकादशीस अन्न पान – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.