अरे हें देह व्यर्थ जावें ।
ऐसें जरी तुज व्हावें ।
द्यूतकर्म मनोभावें ।
सारीपाट खेळावा ॥१॥
मग कैचें हरीचें नाम ।
निजेलिया जागा राम ।
जन्मोजन्मींचा अधम ।
दुःख थोर साधिलें ॥ध्रु.॥
विषयसुखाचा लंपट ।
दासीगमनीं अतिधीट ।
तया तेचि वाट ।
अधोगती जावया ॥२॥
अणीक एक कोड ।
नरका जावयाची चाड ।
तरी संतनिंदा गोड ।
करीं कवतुकें सदा ॥३॥
तुका म्हणे ऐसें ।
मना लावी राम पिसें ।
नाहीं तरी आलिया सायासें ।
फुकट जासी ठकोनी ॥४॥
अर्थ
हा नरदेह वाया जावा असे तुला वाटेत असेल तर तू खुशाल सारिपाट द्यूत खेळत रहा .मग हरिचे नाम तुझ्या मुखी येणार नाही, तू अज्ञानाच्या निद्रित असल्यामुळे राम तुला भेटणार नाही, त्यामुळे तुला जन्मों जन्मीचे दुःख भोगावे लागेल .प्रपंच्यातील विषयसुखाची लंपटता, परस्त्री आसक्ति या सर्व अधोगतिला जाणाऱ्या वाटा आहेत .नरकात जाण्यासाठी संतनिंदा हा आणखी एक मार्ग आहे .तुकाराम महाराज म्हणतात, नारादेहाचे सार्थक व्हावे असे वाटत असेल तर मनाला रामाचे वेड लाउन घे, नाहीतर नारजन्माचे सर्व कष्ट फुकट जातील .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.