कपट कांहीं एक ।
नेणें भुलवायाचें लोक ॥१॥
तुमचें करितों कीर्त्तन ।
गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥
दाऊं नेणें जडीबुटी ।
चमत्कार उठाउठी ॥२॥
नाहीं शिष्यशाखा ।
सांगों अयाचित लोकां ॥३॥
नव्हें मठपति ।
नाहीं चाहुरांची वृत्ति ॥४॥
नाहीं देवार्चन ।
असे मांडिलें दुकान ॥५॥
नाहीं वेताळ प्रसन्न ।
कांहीं सांगों खाण खुण ॥६॥
नव्हें पुराणिक ।
करणें सांगणें आणीक ॥७॥
नाहीं जाळीत भणदीं ।
उदो म्हणोनि आनंदी ॥८॥
नेणें वाद घटा पटा ।
करितां पंडित करंटा ॥९॥
नाहीं हालवीत माळ ।
भोंवतें मेळवुनि गबाळ ॥१०॥
आगमीचें नेणें कुडें ।
स्तंभन मोहन उच्चाटणें ॥११॥
नव्हें यांच्या ऐसा ।
तुका निरयवासी पिसा ॥१२॥
अर्थ
लोकांना भुलाविण्यासाठी मी कोणतेही कपटकृत्य करीत नाही .देवा मी फक्त तुमचे उत्तम गुण गातो आणि नामस्मरण करतो .लोकांना भूल पाडण्यासाठी मी जडीबूटीचा चमत्कार दाखवित नाही .माझी याचना न करणारी वृत्ती पसरवीणारी माझे कोणी शिष्यमंडळी नाहीत .मी मठपति नाही, मला जमिनींची देणगी मिळालेली नाही .दूकान मांडावे तसे देवाची पूजा अर्चा करण्याचे असे उघड प्रदर्शनहि मी मंडलेले नाही .भुत-वेताळाला वष करुण लोकांचे भविष्य जाणणारा मी नाही .लोकांना सांगणारा एक आणि करणारा, असा मी एक दांभिक आणि पुराणिकही नाही .मी अंबाबाईचा उदो म्हणून कोणत्याही माणसाच्या डोक्यावर खापर जाळत नाही.उदो, उदो म्हणत नाचणारा भावाविन कोरडया भक्तीचा वेदांत सांगणारा करंटा पंडितही नाही .हातातील जपमाळ हलवुन, भोवती पाखंडयांचा मेळा जमावणारा मी नाही .आपले महत्त्व वाढविण्यासाठी स्तंभन, मोहन, उच्चाटनासारखे खोटे उपचारही मी करीत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, एका विठ्ठलभक्तिवाचून मी कोणतेही उपचार जानत नाही .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.