केला मातीचा पशुपति ।
परि मातीसि काय महती ।
शिवपूजा शिवासी पावे ।
माती मातीमाजी सामावे ॥१॥
तैसे पूजिती आम्हां संत ।
पूजा घेतो भगवंत ।
आम्ही किंकर संतांचे दास ।
संतपदवी नको आम्हांस ॥ध्रु.॥
केला पाषाणाचा विष्णु ।
परी पाषाण नव्हे विष्णु ।
विष्णुपूजा विष्णुसि अर्पे ।
पाषाण राहे पाषाणरूपें ॥२॥
केली कांशाची जगदंबा ।
परि कांसें नव्हे अंबा ।
पूजा अंबेची अंबेला घेणें ।
कांसें राहे कांसेंपणें ॥३॥
ब्रम्हानंद पूर्णामाजी ।
तुका म्हणे केली कांजी ।
ज्याची पूजा त्याणेंचि घेणें ।
आम्ही पाषाणरूप राहणें ॥४॥
अर्थ
मातीचे शिवलिंग करून त्याची पूज्या केली ती शंकराला पावते, त्या मध्ये मातीचे काय महत्व कारण, शिवलिंगाचे विसर्जन केल्यानंतर माती पुन्हा मातीत मिसळते.
त्याच क्षणी तीचे महत्त्व संपते, तसेच संत आम्हा सेवकाची पूजा करतात, ती संतहृदयातील पुजा भगवंतास पावते, आम्ही संतांचे सेवक असल्यामुळे संतपदविचा मोह आम्हाला नाही.
दगडी विष्णुमूर्तीची पूजा केली असता, पाषाण विष्णु होत नाही पुजा विष्णुला पावते, दगड दगडरुपच राहतो.
काशाची जगदंबेची मूर्ती केली आणि तिची पूजा केली तर ती जगदंबेला पावते, कासे हा धातु धातुच राहतो.
तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचे आपण ज्याची पुजा करु त्याची पुजा त्याला अर्पण होते, संतांचा भक्तीभाव हा पुजेप्रमाने एक माध्यम आहे, त्याद्वारे सामान्य मनुष्य भक्ती करतो आणि अंती ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.