तेव्हा होतो भोगाधीन । तुम्हां भिन्न पासूनि ॥१॥
आतां बोलों नये ऐसें । आनारिसें वेगळें ॥ध्रु.॥
सन्मुख जालों स्वामीकडे । भव आंगडे निराळे ॥२॥
चिंतिलें तें चिंतामणी । फिटे धणी तों द्यावें ॥३॥
सहज स्थिती आहे अंगीं । प्रसंगीं ते वंचेना ॥४॥
तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥५॥
तुका म्हणे जाणोनि वर्म । कर्माकर्में ठेविलीं ॥६॥
अर्थ
देवा मी ज्यावेळी तुमच्या पासून भिन्न होतो त्यावेळी मी भोगाच्या आधीन होतो. आता मी तुमच्या जवळ आलो आहे मी मागचे काहीच बोलत नाही. आता मी माझ्या स्वामीच्या पांडुरंगाच्या पुढे आलो आहे त्यामुळे मी माझ्या अंगावरील संसाराचे उपाधी रूप कपडे काढून टाकत आहे. मनात जी इच्छा असेल ती चिंतामणी पूर्ण करतो, देवा तुमच्या अंगी अशीच सहजच स्थिती आहे ती प्रसंगानुसार लपविली जरी असली तरीही भक्तांची इच्छेनुसार उघडकिस येतेच. म्हणून मी तुमची कास धरली आहे देवा आणि प्रपंचाचा नाश केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी तुमची सर्व वर्म जाणली आहे त्यामुळे सर्व कर्म अकर्म बाजूला ठेवून मी तुम्हाला शरण आलो आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.