नको माझे मानूं आहाच ते शब्द । कळवळ्याचा वाद करीतसें ॥१॥
कासयानें बळ करूं पायांपाशीं । भाकावी ते दासीं करुणा आह्मीं ॥ध्रु.॥
काय मज चाड असे या लौकिकें । परी असे निकें अनुभवाचें ॥२॥
लांचावल्यासाठी वचनाची आळी । टकळ्यानें घोळी जवळी मन ॥३॥
वाटतसे आस पुरविसी ऐसें । तरि अंगीं पिसें लावियेले ॥४॥
तुका म्हणे माझी येथेंचि आवडी । श्रीमुखाची जोडी इच्छीतसें ॥५॥
अर्थ
देवा मी तुझ्याशी जे काही बोलत आहे ते माझे शब्द पोकळ मानू नकोस. मी मी तुझ्याशी अतिशय कळवळ्याने बोलत आहे. देव मी कशाच्या बळावर तुमच्या पायाला घट्ट धरू. आम्ही दासांनी फक्त तुझी करूणा भाकावी एवढेच. देवा मला लौकीकाची आवड आहे काय? परंतु मला तुझा अनुभव यावा एवढी इच्छा आहे. देवा मला तुझ्या शी बोलता यावे तुझा अनुभव घ्यावा याची इच्छा आहे व त्यामुळेच माझे मन तुझ्याजवळ घोळत आहे गिरक्या घेत आहे. देवा मला पूर्ण खात्री आहे की तू माझी इच्छा पूर्ण करशील त्यामुळेच मी माझ्या मनाला तुझे वेड लावून घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला या श्रीहरीचे श्रीमुख दिसावे आणि ते पाहण्याची इच्छा झालेली.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.