हा गे आलों कोणी म्हणे – संत तुकाराम अभंग –1344
हा गे आलों कोणी म्हणे बुडतिया । तेणें किती तया बळ चढे ॥१॥
तुम्ही तंव भार घेतला सकळ । आश्वासिलों बाळ अभयकरें ॥ध्रु.॥
भुकेलियां आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ॥२॥
तुका म्हणे दिली चिंतामणीसाठी । उचित कांचवटी दंडवत ॥३॥
अर्थ
पाण्यात बुडत असलेल्या माणसाला जर म्हटले की ‘थांब मी आलोय’ तर त्याला किती बळ येते. त्याप्रमाणे तुम्ही संतांनी माझा सर्व भार तुमच्या माथ्यावर घेतला आहे व माझ्यासारख्या बाळाच्या मस्तकावर तुमचा अभय हस्त ठेवून “भिऊ नकोस” असे आश्वासन तुम्ही मला दिले आहे. एखाद्या भुकेलेल्या मनुष्याला म्हटले की थांब मी तुला जेवू घालतो तर त्याला किती समाधान मिळते. तुकाराम महाराज म्हणतात की संतांनी माझा सर्व भार त्यांच्या माथी घेतला व त्या बदल्यात मी त्यांना फक्त साष्टांग नमस्कार केला, हे म्हणजे असे झाले की त्यांनी मला चिंतामणी रत्न द्यावा आणि मी त्यांना त्या बदल्यात काचेचा तुकडा द्यावा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
हा गे आलों कोणी म्हणे – संत तुकाराम अभंग –1344
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.