लेंकरा लेववी माता अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी॥१॥
कृपेचें पोसणें तुमचें मी दीन । आजि संतजन मायबाप ॥ध्रु.॥
आरुषा उत्तरीं संतोषे माउली । कवळूनि घाली हृदयात ॥२॥
पोटा आलें त्याचे नेणे गुणदोष । कल्याणाचि आस असावें हें ॥३॥
मनाची ते चाली मोहाचिये सोई । ओघ गंगा काई परतों जाणे ॥४॥
तुका म्हणे कोठें उदार मेघां शक्ती । माझी तृषा किती चातकाची ॥५॥
अर्थ
आई आपल्या लेकराला आवडीने अलंकार घालते व त्याला पाहिल्यानंतर तिच्या आनंदाला अंतपार नसते. त्याप्रमाणे हे संतजनहो तुम्ही माझे मायबाप आहात आणि तुमच्या कृपेने पोचला जाणारा मी दिन आहे. मुल कसेही बोलले तरी त्याच्या आईला संतोष वाटतो व ती आई त्याला आपल्या हृदयाशी धरून कवटाळते. आपल्या पोटी आलेल्या मुलाचे गुणदोष आई पाहत नसते उलट त्याचे कल्याण व्हावे हीच तिची इच्छा असते. मुलाविषयी त्या आईचा मोह असतो त्यामुळेच तिचे मुलाकडे मन धाव घेते. गंगेचा प्रवाह कधी मागे फिरतो का, त्याप्रमाणे आईचे मन त्या मुला पासून कधीच मागे फिरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मेघाला वर्षाव करण्याची शक्ती अमर्याद असते, मग माझ्यासारख्या चातकाची तहान आहे ती म्हणजे किती, संत हे म्हणजे मेघाप्रमाणे आहेत तर मी चातकाप्रमाणे आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.