पाहों ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे ॥१॥
होईल तें हो या विठोबाच्या नांवें । अर्जिले भावे जीवीं धरूं ॥ध्रु.॥
एखादा अंगासी येईल प्रकार । विचारितां फार युक्ती वाढे ॥२॥
तुका म्हणे आळी करितां गोमटी । मायबापा पोटीं येते दया ॥३॥
अर्थ
खूप ग्रंथ वाचावे परंतु इतके आयुष्य हाती नाही. समजा जरी ग्रंथ वाचण्यास मिळाले तरी तेवढी बुद्धी माझी नाही. आता विठोबाचेच नाम घेऊ आणि काय होईल ते होवो. जे साधन मिळविले आहे ते आता विश्वासाने आपल्या भक्तिभावाने जीवात साठवून ठेवू. मी जर ग्रंथाचा अभ्यास केला तर माझ्या अंगी अभिमाना सारखे प्रकार येतील आणि त्याचा फार विचार केला तर तर्ककुतर्क वाढतील. तुकाराम महाराज म्हणतात मुलाने चांगल्या गोष्टीसाठी हट्ट धरला तर त्याची आई बापाला दया येते त्याप्रमाणे हरीचे नाम आपल्या मुखाने घेतले तर या हरीला आपली दया येते व तो आपला उद्धार करतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.