बोलाचे गौरव – संत तुकाराम अभंग –1280
बोलाचे गौरव । नव्हे माझा हा अनुभव ॥१॥
माझी हरीकथा माउली । नव्हे आणिकांसी पांगिली ॥ध्रु.॥
व्याली वाढविलें । निजपदीं निजवलें ॥२॥
दाटली वो रसें । त्रिभुवन ब्रम्हरसें ॥३॥
विष्णु जोडी कर । माथां रज वंदी हर ॥४॥
तुका म्हणे बळ । तोरडीं हा कळिकाळ ॥५॥
अर्थ
मी हरीकथा फक्त व बोलण्यापुरते हरीकथेचे महत्व सांगतोय असे नाही तर मला प्रत्यक्ष त्याचा अनुभव आहे. माझी हरीकथा माऊली कोणच्याही पारतंत्र्याखाली नाही ती भक्तांचा उध्दार करण्याकरता पूर्णपणे स्वतंत्र आहे. या हरीकथा माऊलीनेच माझ्या आध्यात्मिक वृत्तीला जन्म दिला त्या वृत्तीला वाढविले आणि या हरीकथा माऊलीनेच मला आत्मसुखाच्या निजपदी निजविले आहे. ही हरीकथा माऊली त्रिभुवनामध्ये ब्रम्हरसाच्या दुधाने भरलेली आहे. श्रीविष्णू या हरीकथा माऊलीचे दूध पिणाऱ्या खऱ्या वैष्णवाला हात जोडतात आणि श्रीभगवान त्या निष्ठावंत वैष्णवांच्या चरणरजाला मस्तकाने वंदन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “याचे एवढे बळ आहे की हा कळीकाळाच्या देखील पायात बेडी घालतो.”
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
बोलाचे गौरव – संत तुकाराम अभंग –1280
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.