जाणोनि नेणतें करीं – संत तुकाराम अभंग –1277
जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥१॥
मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥
ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥२॥
देखोनि न देखें प्रपंच दृष्टी । स्वप्नीचिया सृष्टि चेइल्या जेवीं ॥३॥
तुका म्हणे ऐसें जालियावांचून । करणें तो सीण वाटतसे ॥४॥
अर्थ
देवा मला तुझे स्वरूप आत्म रूपाने समजल्या वरही, तुझे माझ्या मनाला सर्व ज्ञान असूनही मला अज्ञानी ठेव. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात राहूनही पाण्या पेक्षा वेगळे राहते त्याप्रमाणे व्यवहारांमध्ये मी राहूनही व्यवहारात न राहिल्या प्रमाणे वर्तन करेल असे मला कर. मी व्यवहारांमध्ये कोणाची निंदा व स्तूती ऐकणार नाही. जसा समाधिस्त योगी बाह्य व्यवहार जाणत नाही अगदी त्याप्रमाणे. जसे स्वप्नात भासलेली सृष्टीच्या जागृत अवस्थेत आल्यानंतर मिथ्या ठरते अगदी त्याप्रमाणे, मी प्रपंचात राहूनही प्रपंच माझ्या दृष्टीने पाहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात अशी स्थिती झाल्यावाचून मी जे काही करत आहे ते मला शिणच वाटत आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
जाणोनि नेणतें करीं – संत तुकाराम अभंग –1277
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.