आम्ही मेलों तेव्हां देह दिला देवा । आतां करूं सेवा कोणाची मी ॥१॥
सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदें ॥ध्रु.॥
बोलतसें जैसें बोलवितो देव । मज हा संदेह कासयाचा ॥२॥
पाप पुण्य ज्याचें तोचि जाणें कांहीं । संबंध हा नाहीं आम्हांसवें ॥३॥
तुका म्हणे तुम्ही आइका हो मात । आम्ही या अतीत देहाहूनी ॥४॥
अर्थ
ज्यावेळी आम्ही देवाला देह अर्पण केला त्यावेळी आम्ही मेलो आहोत .त्यामुळे मी आता कोणत्या साधनाद्वारे देवाची सेवा, पूजा करू .प्रारब्धाची सूत्रे देवाच्या हातात आहे आणि तो या देहरूपी पुतळ्याला जसा हलवीत आहे तसा हा देह हलतो. तो देव जसे मला बोलावीत आहेत तसे मी बोलत आहे. त्यामुळे हा देव सर्व क्रिया करतो यात कोणतीही शंका मला राहिली नाही. आम्ही हा देह देवाला अर्पण केला त्यामुळे या देहाकडून जे पाप-पुण्य घडते ते देवालाच माहित आमचा त्याच्याशी काहीच संबंध राहतोच कुठे? तुकाराम महाराज म्हणतात लोकांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते म्हणजे आम्ही या देहापासून अलिप्त आहोत अतीत म्हणजे वेगळे आहोत.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.