जिव्हा जाणे फिकें मधुर की क्षार । येर मास पर हातास न वळे ॥१॥
देखावें नेत्रीं बोलावें मुखें । चित्ता सुखदुःखें कळों येती ॥ध्रु.॥
परिमळासी घ्राण ऐकती श्रवण । एकाचे कारण एका नव्हे ॥२॥
एकदेहीं भिन्न ठेवियेल्या कळा । नाचवी पुतळा सूत्रधारी॥३॥
तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता । कां तया अनंता विसरलेती ॥४॥
अर्थ
एखाद्या पदार्थाची चव फिकी, गोड आहे की खारट हे फक्त जिभेलाच कळते जिभेला मांस आहे तसेच इतर अवयवांना ही मांस आहे ,पण जर हाताला विचारले तर हातांनाच पदार्थांची चव सांगता येणार नाही .जसे नेत्राला दिसते, मुखाला बोलता येते आणि चित्तालाच सुखदुःख समजते ,नाकाने वास घेता येतो आणि कानाने ऐकता येते याप्रमाणे एका इंद्रियाने होणारे ज्ञान दुसऱ्या इंद्रियाला होत नाही. देवाने एका देहाच्या ठिकाणी भिन्न भिन्न धर्म ठेवले आहेत आणि सर्वांची सूत्र हातात धरून या देहाला नाचवीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात एवढी ज्याची सत्ता आहे त्या अनंताला तुम्ही का विसरता?
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.