भूतीं देव म्हणोनि भेटतों या जना । नाहीं हे भावना नरनारी ॥१॥
जाणे भाव पांडुरंग अंतरींचा । नलगे द्यावा साचा परिहार ॥ध्रु.॥
दयेसाठी केला उपाधिपसारा । जड जीवा तारा नाव कथा ॥२॥
तुका म्हणे नाहीं पडत उपवास । फिरतसे आस धरोनियां ॥३॥
अर्थ
सर्वत्र देव आहे असे समजूनच मी सर्वांना आलिंगन देतो स्त्री पुरुष ही भावनाच माझ्या मध्ये नाही .माझ्या अंतरंगातील सर्वकाही पांडुरंग जाणतो आहे त्यामुळे यासंबंधी अधिक काही बोलण्याची मला गरज वाटत नाही .जड जीवांना तारण्याकरता हरिकथा ही योग्य नौका आहे आणि मला जड जीवांची दया येते त्यामुळे मी हरिकथा करतो व त्यासाठीच मी हरी कथा करण्याची उपाधी आणि पसारा घातलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात घरी खाण्यास मला अन्न नाही की काय म्हणून मी उपवास करतो, मला काहीतरी मिळेना या आशेने हरिकथा करत सगळीकडे मी फिरत आहे असे तुम्हाला वाटते काय ,तर तसे नाही जड जीवांचा उद्धार व्हावा याकरिता मी फिरतोय
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.