अग्नि हा पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवें तोचि तापे जाउनियां ॥१॥
उदक म्हणे काय या हो मज प्यावें । तृषित तो धांवे सेवावया ॥ध्रु.॥
काय वस्त्र म्हणे यावो मज नेसा । आपुले स्वइच्छा जग वोढी ॥२॥
तुकयास्वामी म्हणे काय मज स्मरा । आपुल्या उद्धारा लागूनियां ॥३॥
अर्थ
अग्नी मुद्दामून कोणाला जवळ बोलावत नाही पण ज्याला थंडी वाजली असेल तोच व्यक्ती अग्नीजवळ जातो. पाणी कधी म्हणते काय या आणि मला प्या तर नाही ज्याला तहान लागली असेल तोच पाणी पिण्यासाठी पाण्याकडे धावत जातो . वस्त्र कधी म्हणते काय कि या आणि मला परिधान करा तर नाही सारे जग उलट स्वतः इच्छेने वस्त्राला परिधान करते .तुकाराम महाराज म्हणतात अगदी त्याप्रमाणे माझा स्वामी कोणाला म्हणतो का की माझे स्मरण करा तर नाही ज्याला आपल्या उद्धाराची तळमळ असते तोच माझ्या स्वामी पांडुरंगाचे स्मरण करतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.