तुका वेडा अविचार – संत तुकाराम अभंग – 1183
तुका वेडा अविचार । करी बडबड फार ॥१॥
नित्य वाचे हाचि छंद । राम कृष्ण हरी गोविंद ॥ध्रु.॥
धरी पांडुरंगीं भाव। आणीक नेणें दुजा देव ॥२॥
गुरुज्ञान सर्वा ठायीं । दुजें न विचारी कांहीं ॥३॥
बोल नाईके कोणाचे । कथे नागवा चि नाचे॥४॥
संगउपचारें कांटाळे । सुखें भलतें ठायीं लोळे ॥५॥
कांहीं उपदेशिलें नेणे । वाचे विठ्ठल विठ्ठल म्हणे ॥६॥
केला बहुतीं फजित । तरी हें चि करी नित्य ॥७॥
अहो पंडितजन । तुका टाकावा थुंकोन ॥८॥
अर्थ
हा तुकाराम फार वेड आहे आणि अविचारी आहे आणि हा हरिभजना विषय फार बडबड करत आहे .माझ्या वाणीला नित्य सर्व काळ राम कृष्ण गोविंद हरी या नामाचा छंद लागला आहे. पांडुरंगा विषयीचा माझा दृढ भक्तिभाव आहे आणि या पांडुरंगा वाचून इतर कोणालाही मी आता मानत नाही. गुरु ज्ञानामुळे मला सर्वत्र हरीच आहे असा अनुभव येत आहे आणि त्या वाचून मी इतर कोणत्याही पदार्थाचा विचार करत नाही .मी शुद्ध संतांशिवाय कोणाचाही उपदेश ऐकत नाही आणि कथेमध्ये मी तल्लीन होऊन इतका नाचतो की मला माझ्या कपड्याची देखील शुद्ध राहत नाही .विषयाचा भोग घेणे या विषयी मला फार कंटाळा आला आहे .आणि हरी सुखामध्ये मी कोठेही लोळतो .कोणी काहीही उपदेश केला तरी तो मला कळत नाही मी माझ्या वाणीने विठ्ठल विठ्ठलच म्हणतो .माझी फजिती अनेकांनी केली तरी मी माझ्या वाणीने हरीचे नाम नित्य सर्वकाळ घेतो .तुकाराम महाराज म्हणतात अहो पंडित जनहो हा तुकाराम वेडाच आहे त्यामुळे तुम्ही त्याची उपेक्षाच करा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
तुका वेडा अविचार – संत तुकाराम अभंग – 1183
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.