कां न वजावें बैसोनि – संत तुकाराम अभंग – 1159

कां न वजावें बैसोनि – संत तुकाराम अभंग – 1159


कां न वजावें बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत ॥१॥
म्हणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणें ॥ध्रु.॥
कथे कांहीं अणुमात्र । नो बोलावा हा वृत्तांत । देवभक्तां चित्त । समरसीं खंडणा ॥२॥
कां वैष्णव पूजावें । ऐका घेईल जो भावें । चरणरजा शिवें । वोढविला मस्तक ॥३॥
ऐसें जाणा हे निभ्रांत । देव वैष्णवांचा अंकित । अलिप्त अतीत । परमित त्यासाठीं ॥४॥
घालोनि लोळणी । तुका आला लोटांगणीं । वंदी पायवणीं । संतचरणींचें माथां ॥५॥

अर्थ

हे श्रोत्यांनो हरिकथा चालू असताना मधून का उठून जाऊ नये ते मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐका. कथा चालू असताना स्वतः पांडुरंग तेथे कथा ऐकण्यासाठी तिष्ठत उभा असतो आणि आपण जर मधून उठलो तर त्या पांडुरंगाची अवज्ञा केल्यासारखा प्रकार होतो त्यामुळे कथेत बसण्याचा धीर धरावा आणि कथा भक्ती भावपूर्वक व लक्ष देऊन ऐकावी. ज्याला हा भवसागर तरुन जायचा असेल त्याने मी सांगितले तसे ऐकावे. कथा चालू असताना कोणत्याही गोष्टी अनुमात्र म्हणजे थोड्या देखील बोलू नये कारण तेथे देव आणि भक्त यांच्या चित्ताचा मिलाप झालेला असतो म्हणजे दोघेही एकरूप झालेले असतात आणि आपण जर मध्येच बोललो तर त्यात बिघाड होतो .वैष्णवांना का पुजावे श्रद्धेने ऐकायचे असेल तर ऐका. वैष्णवांच्या पायाची धूळ म्हणजे रजकण चरणरज आपल्या मस्तकाला लावता यावी म्हणून भगवान शंकर देखील आपले मस्तक पुढे करत असतात त्यामुळे वैष्णवांना पुजावे देव वैष्णवांचा अंकित आहे हे तुम्ही जाणून घ्या. तो देव या जगतामध्ये राहून देखील या जगापासून अलिप्त आहे विलक्षण आहे आणि असा देव वैष्णवां करिता सगुण-साकार झाला आहे .तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवांचा एवढा अनन्यसाधारण महिमा आहे ,त्यामुळे मी वैष्णवांच्या चरणी लोळणी घालून त्यांच्या चरणावर लोटांगण घालत आहे वैष्णवांचे चरण धुवून, धुतलेल्या तीर्थ ला मी माझ्या मस्तकाला, माथ्याला लावतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

कां न वजावें बैसोनि – संत तुकाराम अभंग – 1159

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.