फिराविलीं दोनी । कन्या आणि चक्रपाणी ॥१॥
जाला आनंदें आनंद । अवतरले गोविंद ॥ध्रु.॥
तुटलीं बंधनें । वसुदेवदेवकीचीं दर्शनें ॥२॥
गोकुळासी आलें । ब्रम्ह अव्यक्त चांगलें ॥३॥
नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपती ॥४॥
निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥५॥
आनंदली मही । भार गेला सकळ ही ॥६॥
तुका म्हणे कंसा । आट भोविला वळसा ॥७॥
अर्थ
वसुदेवाने मथुरेच्या तुरुंगांमध्ये देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या कृष्णाला उचलून गोकुळात यशोदे जवळ आणून ठेवले आणि यशोदेला झालेली योगमाया रूप कन्येला देवकी जवळ आणून ठेवली. अशाप्रकारे कन्येची आणि चक्रपाणी हरीचे आदलाबदल करण्यात आली .ज्या वेळी कृष्णाने जन्म घेतला त्यावेळी जिकडे तिकडे आनंदीआनंद झाला.श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि वसुदेव देवकीच्या हातातील सर्व बंधने आपोआप तुटून गेली .अव्यक्त चांगले ब्रम्ह गोकुळात नाम रूपाला आले. नंद-यशोदा धन्य आहेत की ज्यांनी श्रीकृष्णाला पाहिले .भगवान श्रीकृष्ण श्रावण वद्य, अष्टमीला, रोहिणी नक्षत्र ,वार बुधवार आणि मध्यरात्रीला जन्माला आले .पृथ्वी ही आनंदली कारण तिचा भार कृष्णाच्या जन्मामुळे हलका झाला .तुकाराम महाराज म्हणतात भगवंताच्या जन्मामुळे कंस भयभीत झाला आणि भयाच्या भोवऱ्यात सापडून गरगर फिरू लागला.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.