माझिया मीपणावरी पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें ।
पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥१॥
काय विटंबना सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दुःख ।
नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती डोळा माझें मुख ॥ध्रु.॥
काया वाचा मनें अघटित करणें । चर्मचक्षु हात पाय ।
निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार । आणीक सांगों किती काय ॥२॥
लक्ष्मीमदें मातें घडले महा दोष । पत्नी दोनी भेदभेद ।
पितृवचन घडली अवज्ञा अविचार। कुटिल कुचरवादी निंद्य ॥३॥
आणीक किती सांगों ते अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन ।
भुतदया उपकार नाहीं शब्दा धीर । विषयीं लंपट शब्द हीन ॥४॥
संत महानुभाव ऐका हें उत्तरें। अवगुण अविचार वृद्धि पापा ।
तुका म्हणे सरतें करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा ॥५॥
अर्थ
माझ्या “मी(अहंकार)” पणावर दगड पडो आणि जगात माझे जे नाम झाले ,माझे जे भूषण झाले आहे त्याला आग लागो. माझ्या पापाला पारावार नाही त्यामुळे मी अनेक दुःखाचे डोंगर भोगत आहे. मी भूमीला भार झालो आहे माझी काय फजिती होत आहे हे मी किती सांगू .माझे दुखने ऐकून दगडही फुटेल. स्त्री-पुरुष ,उत्तम वर्णातील लोक, चांडाळ हे सर्वजण डोळ्याने माझे मुख देखील पाहत नाहीत. माझ्या काया, वाचा ,मनाने ,चक्षूने ,हाताने ,पायाने निंदा, द्वेष ,घात ,दुसऱ्यांचा विश्वास तोडणे ,व्याभिचार असे अनेक अनहित कर्म केलेले आहेत माझ्या हातून वाईट कर्मे घडलेली आहेत आता ते मी कसे सांगू ?संपत्तीच्या मदाने माझ्या हाताने अनेक महापाप घडले मी दोन पत्नीमध्ये भेद करत होतो. पितृवचनाची मी अवज्ञा केली असा मी अविचारी ,कुटील कुच्चर ,भांडखोर आहे .मी आता माझे किती अवगुण तुम्हाला सांगू ते सांगण्याकरिता देखील जीभ वळत नाही. मन थरथर कापते. मी कधीही भूतदया केली नाही कोणावर कधीही उपकार केले नाही. माझ्या शब्दांना धीर नाही स्थैर्य नाही. मी विषय लंपट आहे माझ्याकडे आता बोलण्यासाठी शब्दच नाही. तुकाराम महाराज म्हणतात संत महानुभव तुम्ही माझे बोलणे ऐका मला तुम्ही पांडुरंगाच्या पायापाशी सरते करा माझे अवगुण अविचार वाढले आहे मग पांडुरंग माझा स्वीकार करील कसा याविषयी विचार करा मला सांगा हे मायबाप हो मी तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर येवढा उपकार करा मला तुम्ही पांडुरंगाच्या पायापाशी सरते करा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.