काय नाहीं माता गौरवीत – संत तुकाराम अभंग – 1149
काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते ॥१॥
काय नाहीं त्याची करीत ते सेवा । काय नाहीं जीवा गोमटें तें ॥ध्रु.॥
अमंगळपणें कांटाळा न धरी । उचलोनि करीं कंठीं लावी ॥२॥
लेववी आपुले अंगें अळंकार । संतोषाये फार देखोनियां ॥३॥
तुका म्हणे स्तुति योग्य नाहीं परी । तुम्हां लाज थोरी अंकिताची ॥४॥
अर्थ
माता आपल्या बाळाचा गौरव करत नाही काय, आणि त्याचा लळा ती पूर्ण करीत नाही काय? माता तिच्या बाळाची सेवा करत नाही काय ,आणि सेवा केल्याने तिला बरे वाटत नाही काय ?ते बाळ अमंगळ जरी असले किंवा दिसण्यास कसेही असले तरी त्या मातेला त्याचा कंटाळा येतो काय ती त्याचा कंटाळा कधीही धरत नाही, उलट त्या बाळाला उचलून कंठाशी लावते किंवा त्याला मिठी देते. ती माता बालकाला अलंकार परिधान करते आणि त्या बालकाला पाहून मातेलाच संतोष होतो तिला खूप आनंद होतो. तुकाराम महाराज म्हणतात हे संत जन हो तुम्ही माझी स्तुती करणे योग्य नाही परंतु तुम्हाला माझा अभिमान असल्यामुळे तुम्ही माझी स्तुती करतात जशी आई आपल्या मुलाचा अभिमानाने गौरव करते अगदी त्याप्रमाणेच.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
काय नाहीं माता गौरवीत – संत तुकाराम अभंग – 1149
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.