नमावे पाय हें माझें उचित । आशीर्वादें हित तुमचिया॥१॥
कृपेचा वोरस न समाये पोटीं । म्हणोनि उफराटीं वचनें हीं ॥ध्रु.॥
तुमची उष्टावळी ते माझें भोजन । झाडावें अंगण केरपुंजे ॥२॥
परि ऐसें पुण्य नाहीं माझें गांठीं । जेणें पडे मिठी पायांसवें ॥३॥
तुका म्हणे राहे आठवण चित्तीं । ऐशी कृपा संतीं केली तुह्मीं ॥४॥
अर्थ
हे संत जन हो तुमच्या पायी मी नमावे म्हणजे नम्र व्हावे हेच उचित आहे कारण तुमच्या आशीर्वादानेच माझे हित होणार आहे .तुम्ही माझ्यावर कृपा केली त्यामुळे माझ्या पोटात आनंद मावत नाही .संतांनो मी तुमची स्तुती करण्याऐवजी तुम्हीच माझी स्तुती करत आहात. मी तुमचे उरलेले अन्न खाणे हेच माझे भोजन आहे तुमचे अंगण झाडावे व झाडलेल्या अंगणातून कचऱ्याचे ढीग उचलून टाकावे हेच माझे कर्तव्य आहे पण असे माझ्या नशिबी नाही की जेणेकरून मला तुमच्या पायाची अखंड मिठी पडेल. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या चित्तामध्ये अखंड हरीची आठवण राहील अशी कृपा तुम्ही माझ्यावर केली तेही मी तुमची कोणतीही सेवा केली नाही तरी, त्याबद्दल मला धन्य वाटत आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.